
डॉ.सौ.शुभांगी पाटील
आज सर्व शाळा व महाविद्यालयातून दिले जाणारे शिक्षण हे परीक्षा पध्दतीतून मिळणाऱ्या गुणवत्तेवर आधारित असे आहे. ही गुणवत्ता विद्यार्थ्यास त्याचा शैक्षणिक प्रवास सुखकर व्हावा आणि एखाद्या चांगल्या नोकरीची संधी मिळावी एवढी सिमित आहे. ज्ञानमंदिरात मिळालेले हे शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आणि जीवनात सर्व पातळीवर यशस्वी होण्यास कमी पडते.
सृजनशीलतेसारखे गुण केवळ पुस्तकातच राहण्याची शक्यता बळावते. शिक्षाय फक्त वर्गात आणि पुस्तकातच शिक्षण असल्याचा समज विद्यार्थ्यांच्या मनात वाढीस लागतो. अन् विद्यार्थी संस्कारक्षम जीवन शिक्षणापासून दूर जातो. जगाचे भवितव्य शिक्षणाशी निगडीत आहे. नवनवीन आव्हाने पेलण्याची ताकद शिक्षणात हवी. याचे भान ठेवून सर्व शाळांतून नवनिर्माणाची क्षमता असणारा चिकित्सक वृत्तीचा, जिज्ञासू, अभ्यासू, विज्ञाननिष्ठ, स्वावलंबी, आत्मविश्वासू, संस्कारक्षम, कणखर बाण्याचा, चारित्र्यसंपन्न आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन मातृभूमीचा उपासक असणारा डोळस व सूजाण विद्यार्थी घडविणारे शिक्षण आज अपेक्षित आहे.
या सर्व गोष्टींचा अभ्यासपूर्वक विचार करुन आणि मुलांच्यामध्ये स्वतःहून ज्ञाननिर्मिती करण्याची क्षमता असते याची जाणीव ठेवून आम्ही आमच्या श्री भैरवनाथ शिक्षण समुहातील विविध शैक्षणिक विभागात विद्यार्थ्यांच्या अंगीभूत विविध कलाकौशल्यांचा व क्षमतांचा सुक्ष्मतेने शोध घेऊन त्यासाठी विविध शैक्षणिक व पूरक उपक्रम, सहशालेय उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, वैविध्यपूर्ण शिबिरे, विविध स्पर्धा, क्षेत्रभेटी व सहलींचे आयोजन करुन शिक्षण आणि संस्कार यांचा सुरेख मेळ घालून विचारसंपन्न व्यवस्थापन करीत आहोत. यामुळे आम्हांस पूर्ण खात्री आहे की, यातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होऊन तो शाळा व वनशिक्षणाच्या पातळीवर परिपूर्ण यशस्वी होईल, तसेच त्याचे पालक, शिक्षक, महाविद्यालय आणि समाजास परमानंद देईल.
याकरिता आपले प्रेम, सहकार्य, सुखद सहवास व सदिच्छा आमच्या पाठीशी सदैव राहोत ही ईश्वरचरणी प्रार्थना!
